मतापूरते पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करून काँग्रेसचा दुष्काळी जनतेच्या भावनेशी खेळ- प्रदीप खांडेकर
मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.25/05/ 2024- सध्या दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे अशा परिस्थितीमध्ये आमदार समाधान आवताडे यांनी ज्या गावात पाण्याची टंचाई आहे अशा गावातील ग्रामपंचायत ला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देत प्रस्ताव आल्यानंतर तात्काळ त्या गावात टँकर सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.मात्र नुकत्याच लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कागदी घोडे नाचविण्याचे खेळ न पाहता काँग्रेसने मतदानाअगोदर ना ‘प्रस्ताव ना कागद’ थेट तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये गावोगावी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करून आम्ही लोकांप्रती किती संवेदनशील आहोत हे दाखवून दिले होते,पण मतदान होताच काँग्रेसने सुरू केलेले पाण्याचे टँकर सर्रास गावातून बंद करत केवळ मते मिळवण्यापुरतेच आमदार प्रणिती शिंदे व काँग्रेसने टँकर सुरू करण्याचा स्टंट केला की काय ? अशी चर्चा आता गावागावातील भोळ्याभाबड्या जनतेतून होऊ लागली आहे.
काँग्रेसने लोकसभेला मते मिळवण्यापुरते पाण्याचे टँकर सुरू करून जनतेच्या भावनेशी खेळ केला असल्याचे मत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व माजी सभापती प्रदीप खांडेकर यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी बोलताना खांडेकर म्हणाले की,सध्या मंगळवेढा तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे अशा परिस्थितीमध्ये मतदारसंघाकडे ढुंकूनही न पाहणारे अनेकजण निवडणूक जाहीर होताच न केल्याच्या कामाचेही श्रेय घेण्यासाठी पुढे आले होते.अनेक जणांनी म्हैसाळचे पाणी,टेंम्भूचे पाणी,24 गावचा प्रश्न मीच सोडवला म्हणूनही उर बडवून घेतल्याचे या मतदारसंघातील जनतेने पाहिले आहे तर आचारसंहिता असतानाही या मतदार संघाच्या लोकप्रतिनिधींने दिवसरात्र जनतेच्या हितासाठी,मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न करत वारंवार जिल्हाधिकारी व प्रशासनाला विनंती करून नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी उपाययोजना करा टँकरचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करा अशी विनंती करत भोसे प्रादेशिक योजनेसाठी सुमारे तीस लाखाचा निधी मंजूर करून घेत योजना सुरू ठेवण्यासाठी धडपड करून लोकांना गैरसोय होणार नाही याबाबत वारंवार पाठपुरावा केला तर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी निवडणुकीपूरते मतदारसंघात येऊन तालुक्यातील मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न करायचा व निवडणूक संपली की आपला पसारा आवरून निघून जायचं हा प्रकार केला असून निवडणुकीपुरतं स्वखर्चातून टँकर सुरू करत लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला हे या सामान्य गोरगरीब जनतेच्या लक्षात आलं असून त्यांच्या भुलभुलैय्याना बळी पडलेली जनता सध्या डोक्यावर हात मारून घेत आहे.मतदान संपताच टँकर बंद करून मतापुरती केलेली स्टंटबाजी लोकांच्या लक्षात आली असून आगामी निवडणुकीत कोणत्या तोंडाने मतं मागणार हा सवाल मतदार विचारल्याशिवाय राहणार नाहीत असेही माजी सभापती प्रदीप खांडेकर यांनी बोलताना सांगितले.