अधिवेशन संपण्यापूर्वी छावणी चालकांची बिले अदा करा- आमदार समाधान आवताडे यांची अधिवेशनात मागणी
मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/०३/२०२५ – मंगळवेढा तालुक्यातील 61 व सांगोला तालुक्यातील 149 चारा छावण्या सन २०१९-२० मध्ये दुष्काळी परिस्थितीत जनावरे जगवण्यासाठी सुरू करण्यात आल्या होत्या मात्र त्या छावण्यांची अंतिम बिले अद्याप अदा केलेली नाहीत. ती बिले हे अधिवेशन संपण्याच्या अगोदर अदा करावीत.पाच वर्षापासून हे छावणी चालक बिले मिळवण्यासाठी सरकारचे उंबरठे झिजवत आहेत.दुष्काळी परिस्थितीत या छावणी चालकांनी घरातील लग्न, दवाखाने, मुलांच्या शैक्षणिक अडचणीसुद्धा बाजूला ठेवून मुक्या जनावरांना जगवण्यासाठी छावण्या चालवल्या होत्या तरीही शासनाने अद्याप त्यांची उर्वरित राहिलेली बिले अदा केलेली नाहीत.त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. इतक्या दिवस ही बिले का दिली नाहीत ? कोणत्या अधिकाऱ्यामुळे हे बिले प्रलंबित राहिली याची चौकशी करून अधिवेशन संपण्यापूर्वी छावणीचालकांची बिले अदा करावीत अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करीत केली आहे .

यावेळी बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की, ही बिले इतके दिवस प्रलंबित राहण्यामागे कारण काय ? ही बिले प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार ? बिलासाठी आत्महत्याचा विचार करणाऱ्या छावणी चालकांना तात्काळ बिले देऊन त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणार का ? असा प्रश्न उपस्थित करून आमदार समाधान आवताडे यांनी छावणीचालकांचा प्रश्नांना वाचा फोडली.
या प्रश्नांना उत्तर देताना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील म्हणाले की,33 कोटी 44 लाख 99 हजार एवढं छावणी चालकांचं अंतिम देयक राहिलेलं आहे.या देयका संदर्भात असलेला सुधारित अहवाल राज्य शासनाच्या समितीकडे आलेला आहे. या संदर्भात आजच मुख्य सचिवाला निर्देश देऊन पाच ते सहा वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या देयकाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावू असे आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिले आहे त्यामुळे छावणी चालकांच्या बिलाचा प्रश्न येत्या काही दिवसात मार्गी लागणार असे चित्र निर्माण झाले आहे.