कवितेची निर्मिती प्रक्रिया या विषयावर कवी इंद्रजीत भालेराव यांचे व्याख्यान संपन्न
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज :पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात मराठी साहित्य परिषद आणि मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांचे कवितेची निर्मिती प्रक्रिया या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ.भगवान नाईकनवरे हे होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.रमेश शिंदे यांनी केले.त्यांनी कवी इंद्रजीत भालेराव यांच्या साहित्यिक कार्याचा संक्षिप्त परिचय उपस्थितांना करून दिला.
आपल्या व्याख्यानात कवी इंद्रजीत भालेराव यांनी कविता कशी सुचते, तिची निर्मिती प्रक्रिया, शब्दांमागील भावना, प्रतिमा, रूपक, तसेच कवीच्या मनातील कल्पनांचे शब्दांमध्ये रूपांतर कसे घडते याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून या सत्राचा लाभ घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सारिका भांगे यांनी केले. आभारप्रदर्शन मराठी साहित्य परिषदेच्या पंढरपूर शाखेचे अध्यक्ष कल्याण शिंदे यांनी केले.या व्याख्यानासाठी महाविद्यालयातील विविध विभागांचे प्रमुख, मराठी विभागातील प्राध्यापक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.