यशस्वी सापळा कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोकसेवकाला रंगेहाथ पकडले
सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी ,दि.०६/०२/२०२५- लाच घेण्याचे प्रमाण काही केल्या कमी होण्याचे नावच घेत नाहीये.रोज कुठेतरी लोकसेवक सापडत आहेत.असाच एका प्रकारणात सहशिक्षक असलेल्या तक्रारदार पुरुष 53 वर्षे,ने आ.लो.से.घनश्याम अंकुश मस्के, वय 43 वर्ष,वरिष्ठ सहायक, शिक्षण विभाग (माध्य.) जिल्हा परिषद,फ्लॅट न.३३,मरगु अपार्टमेंट, यशवंत मिल जवळ,अक्कलकोट रोड,सोलापूर वर्ग – 3 यांच्याविरुध्द पैशाची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांच्याकडे नोंदवली होती.

यातील तक्रारदार यांची सहशिक्षक पदावर सेवा 24 वर्षे पूर्ण झाल्याने त्यांना देय असणारे निवडश्रेणी मान्यतेकरिता दि. 25/10/2023 रोजी योग्य मार्फतीने शिक्षणाधिकारी(माध्य), जि प सोलापूर यांच्या कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. सदर बाबत तक्रारदार हे आलोसे घनश्याम अंकुश मस्के वय 43 वर्ष,वरिष्ठ सहायक, शिक्षण विभाग (माध्य.) जिल्हा परिषद, सोलापूर यांच्याकडे पाठपुरावा करत होते. तक्रारदार यांचे निवड श्रेणी मान्यतेसाठी आलोसे यांनी यापूर्वी पाच हजार रुपये स्विकारून रुपये 30,000/- आणून दिल्यावर मान्यतेसाठी प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करणार असल्याचे सांगितले असल्या बाबतच्या प्राप्त तक्रारीवरून आज रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईमध्ये आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे रुपये 40,000/- लाचेची मागणी करून तडजोडीअंती रुपये 32,000/- लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता रुपये 20,000/- स्वतः स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
यातील तक्रारदार यांनी दि.06/02/2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांच्याकडे लिखित तक्रार दिली होती त्या अनुषंगाने आज दि.6/2/2025 रोजी शिक्षण विभाग (माध्य) जिल्हा परिषद, सोलापूर येथे पडताळणी केली असता आरोपीनी पंचासमक्ष 40,000/- रुपये स्वतः मागणी करून तडजोडीअंती रुपये 32,000/- मागणी केली.
यातील आरोपीत लोकसेवक याने आज दि. 06/02/2025 रोजी तक्रारदार यांचेकडून स्वतः चे कार्यालयात 20,000/- रु.पहिला हप्ता म्हणून पंचासमक्ष स्वीकारले असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. यावेळी आरोपीच्या अंग झडतीत 22,020/- रूपये रोख रक्कम,मोबाईल फोन,मनगटी घड्याळ, स्वतः चे आधार कार्ड,पितळी अंगठी,रुमाल या वस्तू मिळून आल्या.वस्तू व सदरची रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे.
आरोपीच्या घरझडतीसाठी पथक तात्काळ रवाना करण्यात आले असून घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे.
सापळा कारवाई दरम्यान यातील तक्रारदार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने सर्व कागदपत्रे प्राप्त करून ताब्यात घेतलेली आहे.आरोपी विरुद्ध सदर बझार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीस अटक करून तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.आरोपींचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून पुढील निरीक्षण करून तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे.
या घटनेचे तपास अधिकारी व सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले , ला.प्र.वि.सोलापूर हे असून या सापळा पथकात एएसआय एस.व्ही.कोळी,पो.ना. संतोष नरोटे,पो.कॉ.गजानन किणगी व चालक पो.ह.राहूल गायकवाड सर्व ला.प्र.वि.सोलापूर हे आहेत.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,लाप्रवि पुणे परिक्षेत्र,अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे/खराडे ला.प्र.वि.पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांनी ही कारवाई केली.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास मोबाईल क्र. 8888824199 ,कार्यालय क्र.0217 2312668
ईमेल dyspacbsolapur@ mahapolice.gov.in
dyspacbsolapur@ gmail.com
टोल फ्री क्र.1064 वर तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी केले आहे.