चिमुकल्या बहिणींच्या अत्याचार अन् हत्येने पुणे हादरलं, शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे राजगुरू नगरमध्ये पोहचल्या

चिमुकल्या बहिणींच्या अत्याचार अन् हत्येने पुणे हादरलं, शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे राजगुरूनगरमध्ये पोहचल्या

पीडित मुलींच्या हत्येच्या निषेधार्थ उपोषणास बसलेल्या प्रतिनिधींशी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची चर्चा व त्वरित दोषारोप पत्र व निकालासाठी प्रयत्नाचे आश्वासन व मनोधैर्य योजना

डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने पीडित कुटुंबीयांनी केले उपोषण समाप्त

पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७ : पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये (Rajgurunagar) शेजारीच वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीय 54 वर्षीय नराधमाने चिमुकल्या मुलींवर अत्याचार करुन खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध नोंदवण्यात येत आहे.शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे या राजगुरूनगरमध्ये पोहचल्या असून त्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

राजगुरूनगरमध्ये एका हैवानाने चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करून अमानुषपणे हत्या केली.या घटनेनं पुणे हादरल्यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे राजगुरूनगरमध्ये पोहचल्यात. नराधम आरोपी अजय दासच्या अटकेनंतर पोलीस तपासात आणखी काय-काय समोर आलंय, याची माहिती घेत डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली.

मुलींवर अत्याचार थांबवायचे असतील तर…; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे नेमकं काय म्हणाल्या ?

राजगुरूनगरमध्ये एका हैवानाने चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करून अमानुषपणे हत्या केली. यानिमित्ताने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पीडित मुलींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जाईल, मात्र या मदतीमुळे त्या दोन्ही चिमुकल्या परत येणार नाहीत.मात्र आरोपींविरूध्द सरकार कठोर पावले उचलेल,असा विश्वास यावेळी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

आता यापुढे परप्रांतीयांच्या नोंदी ठेवण्याची गरज आहे. सोबतच ते ज्या राज्यातून येतात तिथली त्यांची पार्श्वभूमी पाहणं आवश्यक आहे. त्यासोबतच स्थानिकांनी भाडेकरूंच्या नोंदी ठेवण्यासाठी आग्रह धरायला हवा. चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी व्हायला हवी, यासाठी आम्हीही पाठपुरावा करू. फास्टट्रॅकमध्ये चालणारे खटले पुढे ट्रॅकवर किती फास्ट चालतात, हे पाहणं आणि प्रलंबित प्रकरणं निकाली लावण्यासाठी न्यायालय दोन शिफ्टमध्ये करावीत, अशी मागणी करताना न्यायव्यवस्था सुबक करण्यावर सरकारने भर द्यावा.भटक्या विमुक्तांसाठी महामंडळ करावं अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे म्हणत डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पीडित कुटुंबीयांना यावेळी आश्वासित केले.

या संतापजनक घटनेनंतर पीडित कुटुंब आणि नातेवाईक आज पोलीस स्टेशन समोर उपोषणासाठी बसले होते. प्रशासनाने लेखी आश्वासनही दिले. मात्र, ठोस भूमिका केव्हा पार पाडणार या मागणीसाठी उपोषण सुरूच होते. पण उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या विश्वासावर भरवसा ठेवून पीडित कुटुंबीयांनी पाणी पिऊन उपोषण समाप्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top